Kisan Care

Krushi Sohla

राज्यात कृषी दिनानिमित्त १ ते ७ जुलै दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याची संकल्पना कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्या आठवड्यात मांडली होती. श्री. भुसे स्वतः नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, कृषी सचिव एकनाथ डवले आज पालघर भागात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद भागात थेट बांधावर जावून श्री. डवले शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेतील.

कृषी विद्यापीठाचे व कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच त्यांच्या अपेक्षा समाजावून घ्याव्यात, असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहेत. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या नियोजनाखाली राज्यभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी होईल. तसेच पुरस्कारप्राप्त, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहेत. तालुकास्तरीय कार्यक्रमात प्रयोगशील शेतकऱ्यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच, कृषी योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलैला कृषी दिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला. 

कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक सप्ताहाच्यानिमित्ताने दररोज एका गावात जाणार आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांना मात्र किमान दोन गावांना जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र शासनाच्या सुचनांनुसार शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी यंदाच्या वर्षी पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्याचे उत्पन्नवाढ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषि विभाग करणार आहे. खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्र यांचे शास्त्रज्ञ या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधणार आहेत.

कृषि तंत्रज्ञानाचा छोटासा अवलंब पिक उत्पादन वाढीमध्ये मोठा परीणाम करू शकतो. या अनुषंगाने परिणामकारक प्रचार व जनजागृती करण्यासाठी दि. 1 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कृषि व संलग्न विभागाच्या सहभागातून कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.